ऑपरेशन टायगर फत्ते ! ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले !! वेगळ्या गटाला लोकसभा अध्यक्षांची तत्काळ मान्यता

Foto
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले असून, उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांनी आज आपला वेगळा गट स्थापन केला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, या सहा खासदारांनी दिल्ली गाठली. तसेच तिथे लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनीही उद्धवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता  दिली आहे.
 
शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. त्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, दिल्लीसह राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी दुपारच्या सुमारास दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. आणि लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली. त्यामुळे बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, असे वृत आहे.
 
काल रात्रीपासूनच ठाकरे गटाचे फुटीर खासदार विशेष विमानाने एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला  यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली.
 
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

अमित शाह यांचा ग्रीन सिग्नल
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. मात्र, दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर १० जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींंशी बातचीत करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यानंतर ऑपरेशन टायगरला खर्‍या अर्थाने वेग आला होता.  तर एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलेली आहे. १० जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधे ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. रात्री ११ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे.
 
काय आहे ऑपरेशन टायगर?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.

संजय राऊत यांची फुटीर खासदारांवर जहरी टीका 
उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या सहा फुटीर खासदारांवर खासदार संजय राऊत यांनी बुधवारी टीकेची जहरी टीका केली. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत यांनी गद्दारी केली. हे साxxx, भोसxxx, यांच्या अंगात गद्दारी भिनली आहे, अशा शेलक्या शब्दांत संजय राऊतांनी फुटीर खासदारांना लक्ष्य केले. तुम्ही आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीने निवडून आले असताना कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. मागे जे झाले त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल. खासदार पक्ष सोडून गेले तर आता आम्ही शांत बसणार नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी राजीनामा द्या, आमच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेत, आमच्या मतदारांमुळे निवडून आला आहात, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.